⛔ २० लाखांच्या नऊ वर्क ऑर्डरसाठी २० टक्के कमिशनची मागणी; पुसद येथील विद्युत भवनातील क्वार्टरमध्ये एसीबीची धडक कारवाई
✍️यवतमाळ : अशफाक खान
महावितरणच्या कामाच्या मोबदल्याचे बिल मंजूर करून देण्यासाठी तब्बल चार लाख रुपयांची लाच स्वीकारताना महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पुसद विभागातील कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. जनार्दन लालू चव्हाण (वय ५७) असे कारवाई झालेल्या अधिकाऱ्याचे नाव असून, ते पुसद विभागात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
या कारवाईमुळे महावितरणच्या विभागात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, तक्रारदार कंत्राटदाराला ब्रेकडाऊन व मेंटेनन्सची तब्बल २० लाख रुपये किमतीची नऊ वर्क ऑर्डर देण्यात आल्या होत्या. या कामांशी संबंधित बिले मंजूर करून देणे तसेच भविष्यात देयकाची रक्कम मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने एकूण रकमेच्या २० टक्के दराने चार लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
🎯 तक्रारीनंतर एसीबीची पडताळणी
तक्रारदाराने शुक्रवारी, १४ ऑगस्ट २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीची गांभीर्याने दखल घेत एसीबीच्या पथकाने त्याच दिवशी सकाळी साडेनऊच्या सुमारास पुसद येथील विद्युत भवन परिसरातील कार्यकारी अभियंता यांच्या क्वार्टरमध्ये लाच मागणीची पडताळणी केली.
या पडताळणीदरम्यान तक्रारदाराला देण्यात आलेल्या नऊ वर्क ऑर्डरच्या एकूण किमतीच्या २० टक्के रक्कम, म्हणजेच चार लाख रुपये लाच म्हणून मागितल्याचे निष्पन्न झाले. तसेच सदर रक्कम त्याच दिवशी सायंकाळी स्वीकारण्याचे मान्य करण्यात आल्याचे एसीबीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

🎯 क्वार्टरमध्येच सापळा; चार लाख स्वीकारताना पकडले
लाच मागणीची खात्री झाल्यानंतर एसीबीने नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला. शुक्रवारी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजता विद्युत भवन येथील कार्यकारी अभियंत्यांच्या क्वार्टरमध्ये तक्रारदाराकडून चार लाख रुपयांची लाच स्वीकारताना जनार्दन चव्हाण यांना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले.
या कारवाईनंतर आरोपी लोकसेवकाला ताब्यात घेण्यात आले असून, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीकडून देण्यात आली आहे. तसेच आरोपीच्या घराची झडती घेण्याची कारवाईही सुरू करण्यात आली आहे.
🎯 एसीबीच्या पथकाची कारवाई
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती घटकाचे पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पर्यवेक्षण अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक राजेश राठोड यांनी काम पाहिले.
सापळा पथकात पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले, पोलीस निरीक्षक रविंद्र सहारे, पोलीस निरीक्षक संजय शिंदे, पोलीस अंमलदार अभय वाघ, वैभव जायले, मोहन ठाणेकर, वाहनचालक राजेश बहिरट आणि उमेश बुजाडे यांचा समावेश होता.
या कारवाईस पोलीस अधीक्षक बापू बांगर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती यांचे मार्गदर्शन लाभले.
🎯 भ्रष्टाचाराची माहिती असल्यास एसीबीशी संपर्क साधण्याचे आवाहन
दरम्यान, कोणत्याही शासकीय कार्यालयातील लोकसेवकाने काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी त्यास बळी न पडता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन एसीबीकडून करण्यात आले आहे. भ्रष्टाचारासंबंधी माहिती अथवा लाच मागणाऱ्या लोकसेवकाविरुद्ध तक्रार असल्यास अमरावती येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महत्त्वाचे : या प्रकरणातील आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे.










