ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

गांजाच्या शेतीवर पांढरकवडा पोलिसांचा मोठा प्रहार; 58 लाखांचा मुद्देमाल जप्त

On: October 18, 2026 4:22 PM
Follow Us:
---Advertisement---

⛔ तिघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये कारवाई; 115 किलो 765 ग्रॅम गांजा जप्त

✍️पांढरकवडा : सफी खान

पांढरकवडा पोलिसांनी अंमली पदार्थ गांजाची लागवड करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करत तब्बल ५८ लाख २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी तीन आरोपींकडून एकूण ११५ किलो ७६५ ग्रॅम निव्वळ गांजा, तसेच गांजाच्या झाडांची मुळे व खोड असा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत केला. या कारवाईमुळे गांजाची अवैध लागवड करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिस स्टेशन पांढरकवडा येथील पोलिसांना १७ ऑक्टोबर २०२६ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीलायक माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी एनडीपीएस कायद्यान्वये कारवाई करत संबंधित आरोपींच्या घरांची व शेतांची झडती घेतली.

या कारवाईत भिकू सुक्या चव्हाण (वय ७९, रा. दहेली तांडा, ता. केळापूर) याच्या घरझडतीत १६० ग्रॅम व शेतातून ३ किलो ७९० ग्रॅम, असा एकूण ३ किलो ९५० ग्रॅम गांजा आढळून आला. त्याची बाजारातील किंमत १ लाख ९७ हजार ५०० रुपये असून, मुळे व खोडाचे २ किलो ४६० ग्रॅम वजन, किंमत एक हजार रुपये, असा एकूण १ लाख ९८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दुसरा आरोपी प्रतापराव ऊर्फ पत्या राठोड (वय अंदाजे ७० वर्षे, रा. मिरा-जिरा) याच्या ई-क्लास शेतातून पाने, फुले व बिया असलेला २ किलो ५६० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्याची बाजारातील किंमत १ लाख २८ हजार रुपये आहे. याशिवाय मुळे व खोडाचे १ किलो ७८० ग्रॅम वजन, किंमत एक हजार रुपये, असा एकूण १ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

तिसरा आरोपी सुदाम जेतरू रामपुरे (वय ६० वर्षे, रा. मिरा-जिरा, ता. केळापूर, जि. यवतमाळ) याच्या शेतातून पोलिसांना सर्वाधिक गांजा मिळून आला. त्याच्या शेतातून पाने, फुले व बिया असलेला तब्बल १०९ किलो गांजा, बाजारमूल्य ५४ लाख ५० हजार रुपये, जप्त करण्यात आला. तसेच मुळे व खोडाचे १०६ किलो ७३५ ग्रॅम वजन, किंमत १० हजार रुपये, आणि एका संपूर्ण झाडाचे २५५ ग्रॅम वजन, किंमत १२ हजार ७५० रुपये, असा एकूण ५४ लाख ७२ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या तिन्ही आरोपींकडून पोलिसांनी एकूण ११५ किलो ७६५ ग्रॅम निव्वळ गांजा, तर मुळे व खोडांचे ११० किलो ९७५ ग्रॅम वजन असा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या संपूर्ण मुद्देमालाची बाजारातील एकूण किंमत ५८ लाख २५० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यातील कलम ८(ब), ८(क), २०(अ), २०(ब), २९ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ३(५) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

ही कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात आणि पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशकुमार गाठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे, सहायक पोलीस निरीक्षक रमाकांत खंदारे, पोलीस उपनिरीक्षक नितीन सुशीर, स्वप्नील कावरे, सहायक फौजदार प्रमोद जुनुनकर, पोलीस हवालदार विलास जाधव, रविकांत दराडे, राजू टेकाम, पोलीस नाईक सुनील राठोड, सचिन काकडे, संदीप मडावी, पोलीस कॉन्स्टेबल राजू मुत्यलवार, अमोल भोकरे, कमलेश काकडे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment