⛔ खुनी नदीच्या पुलाजवळ भीषण अपघात; दोन मित्र गंभीर जखमी, अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
✍️पांढरकवडा : अशफाक खान
केळापूर येथील जगदंबा मंदिरात दर्शन घेऊन दुचाकीने येरणगावकडे परतणाऱ्या तिघा मित्रांच्या दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याची हृदयद्रावक घटना रविवार, दि. 18 ऑक्टोबर रोजी रात्री पांढरकवडा–केळापूर मार्गावरील खुनी नदीच्या पुलाजवळ घडली. या भीषण अपघातात अजय उत्तम मेश्राम (वय 25, रा. येरणगाव, ता. घाटंजी) याचा मृत्यू झाला, तर त्याचे दोन मित्र अविनाश शंकर गिनगुले (वय 25) आणि रमेश ढाले (वय 30) हे गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजय उत्तम मेश्राम हा आपल्या मित्र अविनाश गिनगुले आणि रमेश ढाले यांच्यासोबत रविवारी सायंकाळी जगदंबा मंदिर, केळापूर येथे दर्शनासाठी गेला होता. दर्शन आटोपल्यानंतर तिघेही MH 29 CG 1464 क्रमांकाच्या स्प्लेंडर दुचाकीने येरणगावकडे परत निघाले होते.
दरम्यान, रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास ते केळापूर बायपास मार्गे पांढरकवड्याकडे येत असताना खुनी नदीच्या पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. वाहनचालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालविल्याने हा अपघात झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

धडकेनंतर दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले. यात अजय मेश्राम याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने पांढरकवडा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. तर अविनाश गिनगुले आणि रमेश ढाले यांनाही गंभीर दुखापत झाल्याने प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे रेफर करण्यात आले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर अजयचा भाऊ विकास उत्तम मेश्राम (वय 34) यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात हजर राहून तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी BNS कलम 106, 281, 125(b), 324(4) अन्वये अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळावरून वाहनचालक पसार झाला असून, पोलिसांकडून अज्ञात वाहनाचा शोध घेण्यात येत आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच अन्य उपलब्ध माहितीच्या आधारे वाहनाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
या अपघातामुळे येरणगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, दर्शनासाठी गेलेल्या तरुणाचा परतीच्या प्रवासात दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.









