ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

अशोक मामा काळे यांचे पुण्यात उपचारादरम्यान निधन;

On: October 18, 2026 5:00 PM
Follow Us:
---Advertisement---

✍️पांढरकवडा : अशफाक खान


पांढरकवडा शहरातील सामाजिक, आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्राशी जिव्हाळ्याचे संबंध असलेले अशोक मामा काळे वय 70 वर्ष यांचे रविवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी पुणे येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता पांढरकवडा शहरात पोहोचताच नातेवाईक, मित्रपरिवार, परिचित तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली.

अशोक मामा काळे हे पांढरकवडा शहरातील शास्त्रीनगर परिसरात वास्तव्यास होते. त्यापूर्वी त्यांनी शहरातील नेहरू वॉर्ड, भोईपुरा परिसरात अनेक वर्षे वास्तव्य केले होते. आपल्या मनमिळाऊ स्वभावामुळे आणि सर्वांशी आपुलकीने वागण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी शहरात मोठा मित्रपरिवार व आप्तेष्टांचा गोतावळा निर्माण केला होता.

🎯 जगदंबा मातेचे निस्सीम भक्त

अशोक मामा काळे हे जगदंबा मातेचे निस्सीम भक्त म्हणून परिचित होते. त्याचबरोबर भगवान सत्यबाबांप्रतीही त्यांची अपार श्रद्धा होती. सत्य साई समितीच्या विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये ते तन-मन-धनाने सहभागी होत असत. धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा उत्स्फूर्त सहभाग असायचा. अध्यात्माची विशेष आवड असलेल्या काळे यांना धार्मिक ग्रंथांचे वाचन तसेच अध्यात्मविषयक साहित्य वाचण्याची विशेष गोडी होती.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, श्रद्धा, सेवाभाव आणि आपुलकी यामुळे त्यांच्याशी जोडलेल्या प्रत्येकाच्या मनात त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. धार्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये ते सातत्याने सक्रिय राहत असल्याने त्यांच्या निधनाने आध्यात्मिक क्षेत्रासह शहरातील परिचितांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.

🎯 अंत्यसंस्कार पार्थिव परतल्यानंतर

पुणे येथून त्यांचे पार्थिव पांढरकवडा येथे आणल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. अंत्यसंस्काराची वेळ व ठिकाण याबाबत नातेवाईकांकडून माहिती देण्यात येणार आहे.

अशोक मामा काळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली तसेच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने काळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या निधनाबद्दल शहरातील नागरिक, मित्रपरिवार व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment