ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

देवी दर्शनावरून परतताना काळाचा घाला!

On: October 17, 2026 2:15 PM
Follow Us:
---Advertisement---

⛔ वाहनावरील नियंत्रण सुटून कार दोन-तीन वेळा उलटली; पांढरकवडा तालुक्यातील आकोली खुर्द येथील पती-पत्नी ठार, मुलासह तिघे जखमी

✍️पांढरकवडा: अशफाक खान


यवतमाळ येथील नवरात्रोत्सवात देवीचे दर्शन घेऊन आकोली खुर्दकडे परतणाऱ्या कुटुंबाच्या आनंदावर काळाने घाला घातला. चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा आणि अन्य दोन प्रवासी जखमी झाले. दि. 17 ऑक्टोंबर शनिवारी पहाटे सुमारे ३ ते ३.३० वाजताच्या सुमारास यवतमाळ शहरातील चापडोह चौफुलीजवळ, चौफुलीपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर हा भीषण अपघात घडला.

या दुर्घटनेत रविंद्र बनवराव शास्त्रकार (वय ४६) आणि त्यांच्या पत्नी जयश्री रविंद्र शास्त्रकार (वय ३७), दोघेही रा. आकोली खुर्द, ता. केळापूर, जि. यवतमाळ, यांचा मृत्यू झाला. तर तेजस रविंद्र शास्त्रकार (वय २०), मनीषा प्रशांत कायरकर (वय ३०, रा. पहापळ) आणि श्रेयस प्रशांत कायरकर (वय ९) हे जखमी झाले असून त्यांच्यावर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

🎯 देवी दर्शनानंतर परतीचा प्रवास ठरला अखेरचा

मिळालेल्या माहितीनुसार, रविंद्र शास्त्रकार, त्यांची पत्नी, मुलगा तेजस तसेच मनीषा कायरकर आणि श्रेयस कायरकर असे पाच जण शुक्रवारी यवतमाळ येथे नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या दर्शनासाठी गेले होते. रात्रभर देवीचे दर्शन घेतल्यानंतर शनिवारी पहाटेच्या सुमारास ते चारचाकी वाहनाने आकोली खुर्दकडे परतीच्या प्रवासाला निघाले.

मात्र, चापडोह चौफुलीजवळ आल्यानंतर अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहन रस्त्याच्या उजव्या बाजूकडून डाव्या बाजूकडे वेगाने जात दोन ते तीन वेळा उलटल्याचे सांगण्यात येते. या भीषण अपघातात वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला.

🎯 पती-पत्नींना गंभीर दुखापत; रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनात अडकलेल्या जखमींना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रविंद्र शास्त्रकार आणि जयश्री शास्त्रकार यांना झालेल्या गंभीर दुखापतींमुळे त्यांचा मृत्यू झाला.

या दुर्घटनेत त्यांचा मुलगा तेजस याच्यासह मनीषा कायरकर आणि चिमुकला श्रेयस जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबाबत पुढील माहिती मिळणे बाकी आहे.

🎯 झोपेची डुलकी लागल्याचा प्राथमिक अंदाज

रविंद्र शास्त्रकार यांना वाहन चालविताना झोपेची डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण पोलिस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

भरधाव वाहन रस्त्यावर उलटत गेल्याने अपघाताची तीव्रता मोठी होती. वाहनाची झालेली अवस्था पाहता हा अपघात किती भीषण होता, याची कल्पना येते.

🎯 आकोली खुर्दवर शोककळा

देवीच्या दर्शनासाठी आनंदाने घराबाहेर पडलेले शास्त्रकार दाम्पत्य परतीच्या प्रवासात कायमचे दूर गेल्याने आकोली खुर्द गावावर शोककळा पसरली आहे. एका कुटुंबातील आई-वडिलांचे छत्र अचानक हरपल्याने नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या दुर्दैवी घटनेने परिसरातील नागरिकांनाही मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, या अपघाताची नोंद अवधूतवाडी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment