ब्रेकिंग पांढरकवडा वणी क्रिकेट संपादकीय मनोरंजन नौकरी सामाजिक विशेष देश विदेश आध्यात्मिक इतर

घरच्या सोयाबीन बियाण्याची आत्तापासूनच जपणूक करा!

On: October 27, 2026 1:05 PM
Follow Us:
---Advertisement---

⛔ पुढील खरीप हंगामातील बियाण्याची टंचाई टाळण्यासाठी कृषी विभागाचे आवाहन; मळणीपासून साठवणुकीपर्यंत शेतकऱ्यांनी घ्यावी विशेष काळजी

✍️झरी-जामनी : अशफाक खान

चालू खरीप हंगामात एल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात घट झाल्याने अनेक भागांत प्रमुख पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. अमरावती विभागातील प्रमुख खरीप पीक असलेल्या सोयाबीनच्या उत्पादनात यंदा घट होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम आगामी खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या सोयाबीन बियाण्याच्या उपलब्धतेवर होऊ शकतो. संभाव्य बियाणे टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी घरगुती सोयाबीन बियाणे जतन व साठवणूक मोहीम राबवून आतापासूनच पुढील हंगामाची तयारी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी झरी-जामनी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे चांगल्या दर्जाचे, निरोगी आणि समाधानकारक उत्पादन देणारे सोयाबीन पीक आहे, विशेषतः ज्यांनी संरक्षित ओलीताची सुविधा वापरून पीक घेतले आहे, त्यांनी पुढील खरीप हंगामासाठी आवश्यक तेवढे बियाणे आत्तापासूनच बाजूला काढून ठेवावे. केवळ स्वतःच्या गरजेपुरते बियाणे जतन न करता, परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध करून दिल्यास गावपातळीवरच बियाण्याची गरज भागविण्यास मोठी मदत होणार आहे.

🎯 मळणी करताना विशेष काळजी आवश्यक

पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून ठेवण्यात येणाऱ्या सोयाबीनची मळणी योग्य पद्धतीने करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बियाण्याची उगवणक्षमता अबाधित राहण्यासाठी मळणी यंत्राचा आरपीएम ३५० ते ४०० पेक्षा कमी ठेवण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. मळणीच्या वेळी बियाण्यांना इजा होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी.

तसेच, वेगवेगळ्या वाणांचे सोयाबीन एकमेकांत मिसळणार नाही, यासाठी काढणी, मळणी आणि हाताळणीच्या प्रत्येक टप्प्यावर काळजी घेणे आवश्यक आहे. मळणी यंत्रात आधीच्या पिकाचे किंवा अन्य वाणाचे अवशेष राहिल्यास बियाण्याची भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक वाणाची मळणी करण्यापूर्वी यंत्र पूर्णपणे स्वच्छ करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

🎯 साठवणुकीतही घ्या खबरदारी

सोयाबीन बियाणे उगवणक्षमतेच्या दृष्टीने संवेदनशील असल्याने त्याची वाहतूक, हाताळणी आणि साठवणूक अत्यंत काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. बियाणे साठवताना मोठ्या प्रमाणात उंच थप्पी लावणे टाळावे. बियाण्यांची अनावश्यक आदळआपट होणार नाही, याची दक्षता घ्यावी. योग्य पद्धतीने साठवणूक केल्यास बियाण्याची गुणवत्ता आणि उगवणक्षमता टिकवून ठेवण्यास मदत होते.

🎯 घरचे बियाणे ठरेल किफायतशीर पर्याय

पुढील खरीप हंगामात बियाण्याची मागणी वाढण्याची आणि बाजारात चांगल्या प्रतीच्या बियाण्याची उपलब्धता कमी होण्याची शक्यता लक्षात घेता, घरचे बियाणे जतन करणे हा शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो. गावातील शेतकऱ्यांनी सामूहिक पातळीवर चांगल्या दर्जाचे बियाणे जतन केल्यास बाहेरील बियाण्यावरचा खर्च कमी होण्यासोबतच परिसरातच योग्य वाणाचे बियाणे रास्त दरात उपलब्ध होण्यास मदत होईल.

त्यामुळे पुढील खरीप हंगामासाठी आवश्यक सोयाबीन बियाण्याचे नियोजन आतापासूनच करा, चांगल्या दर्जाच्या उत्पादनातून बियाणे राखून ठेवा आणि त्याची योग्य पद्धतीने मळणी व साठवणूक करा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी, आर.आर. दासरवार झरी-जामनी यांच्या वतीने शेतकरी बांधवांना करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment