✍️पांढरकवडा: अशफाक खान
पांढरकवडा नगर परिषद २०२५ च्या नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या अत्यंत चुरशीच्या व लक्षवेधी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आतिश उर्फ सोनू लक्ष्मणराव बोरेले यांनी अखेर २०३ मतांच्या फरकाने विजय मिळवत शहराच्या राजकारणात नवा इतिहास रचला. एकूण सात उमेदवार रिंगणात असलेल्या या निवडणुकीत शेवटच्या फेरीपर्यंत मतमोजणीमध्ये प्रचंड चढ-उतार पाहायला मिळाले. अखेर भाजपाचे उमेदवार सोनू बोरेले यांनी बाजी मारत नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले.
🎯 सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि सामाजिक उपक्रमांची पोचपावती
या विजयामागे केवळ प्रचार नव्हे, तर मागील सहा-सात महिन्यांपासून सुरू असलेली सातत्यपूर्ण तयारी आणि जनतेशी थेट संवाद कारणीभूत ठरल्याचे शहरात बोलले जात आहे. श्रावण महिन्यातील कावड यात्रेचे आयोजन, स्वखर्चाने ट्रॅक्टर लावून शहरातील गल्लीबोळांमधील कचरा व घाण उचलण्याचे प्रत्यक्ष काम, तसेच नवरात्रोत्सवात दांडिया कार्यक्रमाचे आयोजन करून भक्तिमय वातावरण निर्माण करण्यास त्यांनी पुढाकार घेतला. या सर्व उपक्रमांची पोचपावती म्हणून मतदारांनी भरघोस पाठिंबा देत त्यांच्या झोळीत मते टाकली.
🎯 बोरेले परिवाराची परंपरा, पण जनतेतून निवडून आलेला नगराध्यक्ष
पांढरकवडा नगरपालिकेत यापूर्वी बोरेले परिवारातील नारायणराव बोरेले आणि संतोष बोरेले यांनीही नगराध्यक्षपद भूषवले आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष सोनू बोरेले हे थेट जनतेतून निवडून आलेले नगराध्यक्ष ठरले आहेत.
🎯 नगरसेवकांची आकडेवारी आणि क्रॉस व्होटिंगचे स्पष्ट संकेत
या निवडणुकीत शहरातील ११ प्रभागांतून एकूण २२ नगरसेवक निवडून द्यायचे होते. त्यामध्ये
शिवसेना (शिंदे गट) – १६ नगरसेवक
भाजपा – ६ नगरसेवक
असे चित्र समोर आले. काँग्रेसला मात्र एकही नगरसेवक निवडून आणता आला नाही.
तरीही नगराध्यक्षपदावर भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाल्याने मतदारांनी मोठ्या प्रमाणावर क्रॉस व्होटिंग केल्याचे स्पष्टपणे दिसून आले. अनेक मतदारांनी नगरसेवकांसाठी वेगवेगळ्या पक्षांना मत दिले, मात्र नगराध्यक्षपदासाठी सोनू बोरेले यांनाच पसंती दिली.
🎯 प्रचारातील राजकीय गणिते
या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री संजय राठोड यांनी शहरात भव्य सभा घेतली होती. याउलट भाजपाच्या उमेदवारांसाठी कोणत्याही मोठ्या भाजप नेत्याची जाहीर सभा झाली नव्हती.
भाजपाचा संपूर्ण प्रचारभार आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी खांद्यावर घेतला. त्यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सोनू बोरेले यांना सोबत घेऊन प्रत्येक प्रभागात कॉर्नर सभा घेतल्या. कडाक्याच्या थंडीतही या सभा झाल्या आणि त्या सभांना नागरिकांची मोठी गर्दी उसळत होती.
🎯 नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार व त्यांना मिळालेली मते
🔺1. किशोर कनाके (उबाठा) – २९०
🔺2. नौशाद तवर (एमआयएम) – १४०
🔺3. ॲड. विनोद तिवारी (काँग्रेस) – १,४८६
🔺4. डॉ. अभिनय नहाते (शिवसेना – शिंदे गट) – ७,६२६
🔺5. शंकर बडे (अपक्ष) – १,०६६
🔺6. सोनू बोरेले (भाजपा) – ७,८२९
🔺7. मोहन म्यानेवार (अपक्ष) – ५२
🔺8. नोटा – ९१
🎯 जनतेच्या अपेक्षा वाढल्या
निवडणूक प्रक्रिया आता पूर्ण झाली असून सोनू बोरेले हे पांढरकवड्याचे नवे “प्रथम नागरिक” बनले आहेत. कोणतेही मतभेद न ठेवता संपूर्ण शहराच्या विकासासाठी, स्वच्छता, पायाभूत सुविधा, पारदर्शक प्रशासन आणि सर्वसमावेशक विकासासाठी ते काम करतील, अशी अपेक्षा शहरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.
पांढरकवड्याच्या राजकीय इतिहासात ही निवडणूक दीर्घकाळ लक्षात राहणारी ठरली असून, जनतेच्या कौलाने विकासाभिमुख राजकारणाला बळ मिळाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
⛔ सदस्य पदी निवडून आलेल्या उमेदवाराचे नाव
1अ.गेडाम कल्पना रमेश शिवसेना
1ब.जिड्डेवार प्रफुल मोरेश्वर शिवसेना
2अ.कडू भाग्यश्री रवींद्र शिवसेना
2ब.चिंचाळकर निलेश उत्तमराव शिवसेना
3अ.वातीले मंगेश रमेश भाजपा
3ब.बोकीलवार प्रियंका स्वप्निल भाजपा
4अ.शेंडे जयश्री अतिश शिवसेना
4ब.खान शैनीला सबरीन समीर शिवसेना
5अ.कर्णेवार योगेश माधव शिवसेना
5ब.बाजोरीया शीतल संदीप भाजपा
6अ.कुटकलवार रुपेश राजा भाजपा
6ब.नक्षणे दिपाली दिपक शिवसेना
7अ.कटकमवार सुरेखा रमेश शिवसेना
7ब.मोहंमद युसुफ मोहंमद शब्बीर शिवसेना
8अ.चितार्लेवार रेखा रामभाऊ भाजपा
8ब. चव्हाण अतिश तानाजी शिवसेना
9अ.धुर्वे गणेश गोवर्धन शिवसेना
9ब.गटलेवार सविता किशोर शिवसेना
10अ.बोरेले अनिल भगवान भाजपा
10ब.जाधव लक्ष्मी सतीश शिवसेना
11अ.कुडमथे करिश्मा पवन शिवसेना
11ब.काझी सरफरजुद्दीन एनुदिन शिवसेना











