⛔ महात्मा फुलेंच्या द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त विद्यार्थ्यांनी उलगडला जीवनपट; साहित्य, शिक्षण, सामाजिक कार्य आणि ‘शेतकऱ्यांचा आसूड’वर अभ्यासपूर्ण मांडणी
✍️पांढरकवडा / सफी खान
केशरबाई चाहल स्मृती प्रतिष्ठानद्वारा संचालित श्री शारदा ज्ञानपीठ शाळेत १० ऑगस्ट २०२६ रोजी आद्य समाजसुधारक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त विशेष भाषणमालेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना महात्मा फुलेंचे जीवन, कार्य आणि परिवर्तनवादी विचार समजावेत तसेच त्यांच्या विचारांचा शैक्षणिक व सामाजिक जीवनावर होणारा प्रभाव जाणून घेता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉ. चाहल सर, मुख्याध्यापक राहुल देवतळे आणि व्यवस्थापक तनवीर शेख यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आले. यावेळी महेश महाजन यांनी सादर केलेल्या बहारदार वंदनगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली.

शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षासोबतच महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षाचे औचित्य साधून संस्थाध्यक्ष डॉ. चाहल यांच्या संकल्पनेतून वर्षभर विविध वैचारिक, शैक्षणिक आणि स्पर्धात्मक उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना महात्मा फुलेंच्या जीवनकार्याची ओळख करून देणारी ही भाषणमाला आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना सहाय्यक शिक्षक सुकेश बत्तलवार यांनी महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षाचे महत्त्व विशद केले. हे वर्ष केवळ औपचारिक स्मरणापुरते मर्यादित न राहता फुलेंचे विचार वाचले, समजले आणि आचरणात आणले जाणारे वैचारिक पर्व कसे ठरू शकते, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांमध्ये फुले यांच्या विचारांची व्यापक जाण निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
या भाषणमालेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत महात्मा फुलेंच्या कार्याचे विविध पैलू प्रभावीपणे मांडले. इयत्ता सातवीतील पृथ्वीराज संदलवार याने महात्मा फुलेंचा जीवनपट उलगडून सांगितला. साक्षी पेंटावर हिने महात्मा फुलेंचे साहित्यिक कार्य, रिया हराळ हिने त्यांचे शैक्षणिक कार्य, वैष्णवी बरोबर हिने सामाजिक कार्य, तर संबोधी रामटेके हिने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यावर माहितीपूर्ण भाषण केले.
विशेषतः जीविका राठोड हिने महात्मा फुले लिखित ‘शेतकऱ्यांचा आसूड’ या महत्त्वपूर्ण ग्रंथाचे विश्लेषण करत त्यातील विचार आणि आजच्या सामाजिक परिस्थितीशी असलेले त्याचे नाते यावर आपले मत मांडले. विद्यार्थ्यांच्या या अभ्यासपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण मांडणीमुळे कार्यक्रमाला वैचारिक उंची प्राप्त झाली.

अध्यक्षीय भाषणातून डॉ. चाहल सर यांनी महात्मा फुलेंचे विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी शाळेच्या माध्यमातून विविध उपक्रम, स्पर्धा आणि वैचारिक कार्यक्रम सातत्याने आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त केला. महात्मा फुले यांचे कार्य केवळ इतिहासाच्या पुस्तकांपुरते मर्यादित न ठेवता समता, शिक्षण, सामाजिक न्याय, विवेकवाद आणि परिवर्तनाची प्रेरणा म्हणून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, हे या उपक्रमांचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रभावी संचालन शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका कु. चारुशीला ठमके यांनी केले, तर प्रस्तावना सहाय्यक शिक्षक सुकेश बत्तलवार यांनी केली.
महात्मा फुलेंच्या विचारांचा जागर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पुढे नेणारा हा उपक्रम शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षातील एक महत्त्वपूर्ण वैचारिक उपक्रम ठरला. विद्यार्थ्यांनी स्वतः अभ्यास करून फुलेंचे जीवनकार्य सादर केल्याने ‘महात्मा फुले समजून घेणे आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे’ या उद्देशाला निश्चितच बळ मिळाले.












